खंड ७८ -- (ऑक्टोबर २०२४ - सप्टेंबर २०२५)

अतिथी संपादकीय ‘नवभारत’ मासिकाचा हा समीक्षा विशेषांक. या प्रकाराचा विषय निवडण्यामागे गेल्या दोन दशकातील मराठीतील समीक्षा स्थितीचे अवलोकन करावे हे जसे आहे, तसेच मराठीतील समीक्षाव्यवहार मोठ्या प्रमाणात आक्रसला हेही एक आहे. वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांतील समीक्षालेखन व परीक्षण लेखनाची जागा आता माहितीपर परिचय मजकुरांनी घेतली आहे. गेल्या पाव शतकातील तात्त्विक व उपयोजित समीक्षेवर आधीच्या पिढीतील समीक्षकांच्या समीक्षालेखनाची गडद छाया आहे. यादृष्टीने वाङ्मय प्रकाराविषयी झालेले लेखन महत्त्वाचे आहे. अर्थात यातील बरेचसे लेखन हे आधीच्या पिढीतील लेखकांनी केलेले आहे. विसाव्या शतकाअखेरीस मराठी समीक्षेत सामाजिक दृष्टिकोणाला प्राधान्य असणारा जीवनवादी, लौकिकतावादी दृष्टिकोण प्रभावी होता. तो या शतकारंभी मंद झाला. मात्र या काळात संविधानमूल्ये आणि साहित्य यासंबंधी काहीएक ग्रंथलेखन झाले. तसेच जागतिकीकरण व मराठी साहित्य या प्रश्नांची वैपुल्याने चर्चा झाली. पाश्चात्त्य समीक्षा सिद्धांतनाचा परिचय करून देणारे लेखन झाले. मराठी समीक्षेला काही नवे आयाम देणारे दृष्टिकोण समीक्षेत प्रवेशित झाले. ग्रंथसंस्कृती, ललितकला, लोकेतिहास, लोकव्यवहार आणि वाङ्मय यातील सहसंबंध उलगडून दाखवणारे लेखन झाले आहे. वाङ्मयाचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोणाधारे काहीएक विचार झाला. तसेच या काळात काही समीक्षकांच्या समीक्षादृष्टीत भारतीय समीक्षा सिद्धान्तांचे पुनःस्मरण आहे. यादृष्टीने भालचंद्र नेमाडे, म. सु. पाटील, सुधीर रसाळ व इतरही समीक्षकांच्या म्हणण्याचा रोख हा भारतीय परिप्रेक्ष्याचा आहे. भालचंद्र नेमाडे यांचा मराठी मूल्ये आणि देशी प्रमाणकांतून मराठी समीक्षा सिद्ध होईल असा आग्रह आहे. या काळातील समीक्षा फार क्षीण झाली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या काळाची गती आणि नवभांडवली व्यवस्थेतील माध्यमांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती. त्यामुळे दीर्घ पल्ल्याचा व्यासंग वाचन चिंतन लोप पावत चालला आहे. आजच्या काळातील गंभीर समीक्षेचा अपवादात्मक प्रयत्नांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात नीतीन रिंढे व विश्राम गुप्ते यांचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक विचारविश्वातून निर्माण झालेल्या आधुनिक मराठी कादंबरीचा विचार नीतीन रिंढे यांनी केला आहे. तर विश्राम गुप्ते यांच्या ‘नवं जग नवी कविता’ या ग्रंथात आधुनिकता व आधुनिकोत्तर काळातील नव्या मराठी कवितेचा विचार आहे. श्रीधर तिळवे यांनी चौथी नवता असा विचार मांडला. गेल्या पाव शतकात नव्याने सुरू झालेल्या वाङ्मयीन नियतकालिकांतून नव्या पिढीची समीक्षा प्रसिद्ध झाली. हे प्रयत्न तुलनेने कमी असले तरी ते महत्त्वाचे होते. मात्र त्यात सातत्याचा अभाव आहे. ‘शब्दवेध’, (शेगाव), ‘खेळ’ (पुणे), ‘अभिधानंतर’ (मुंबई) ‘नवाक्षर दर्शन’ (सावंतवाडी) ‘ऐवजी’(बुलढाणा), ‘अतिरिक्त’ (शेगाव), ‘परिवर्तनाचा वाटसरू’, (पुणे) ‘अनाघ्रात’ (छत्रपती संभाजीनगर) ‘हाकारा’ (पुणे), ‘काव्याग्रह’(वाशीम), ‘सजग’, या नियतकालिकांतून हे लेखन प्रसिद्ध झाले. ‘युगवाणी’ अंकाने प्रसिद्ध केलेला अरुण कोलटकर विशेषांक हाही या काळातील एक धाडसी प्रयत्न. ‘मुक्त शब्द’ या वाङ्मयीन नियतकालिकाने समीक्षेविषयी सातत्याने चिकित्सक आणि गंभीर अशी समीक्षा प्रसिद्ध केली. आधीच्या पिढीतील विलास सारंग, चंद्रकांत पाटील, वसंत आबाजी डहाके, राजीव नाईक, वसंत पाटणकर, हरिश्चंद्र थोरात या समीक्षकांनी लिहिलेली समीक्षा महत्त्वाची आहे. सारंग यांच्या छोट्या-छोट्या लेखांमधून व ग्रंथांमधून सूत्ररूपाचा विचार आहे. भारतीय व पाश्चात्त्य वाङ्मयाचा व्यासंगाचा व मार्मिक निरीक्षणाचा पैस त्यांच्या लेखनाला होता. महाराष्ट्रातील जातवास्तव, मध्यमवर्ग, काळ स्थित्यंतरे व मराठी साहित्याचा लावलेला अन्वयार्थ मर्मज्ञ आहे. याच साखळीतले त्यांच्या ‘अरुण कोलटकरांची बिलोरी कविता’ या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. तसेच चंद्रकांत पाटील यांचे ‘आणि तोपर्यंत’ आणि ‘कवितेसमक्ष’ या समीक्षाग्रंथाचा आवर्जुन उल्लेख करता येईल. वाङ्मयाविषयीचा सुस्पष्ट असा दृष्टिकोण, प्रस्थापित मतांपेक्षा अपारंपरिक मते, तौलनिक दृष्टी ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये होत. आधीच्या काळाप्रमाणेच ललित लेखकांपैकी रंगनाथ पठारे यांचा ‘आजची कादंबरी नोंदी आणि निरीक्षणे’ (2014) हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. तंत्रज्ञान माध्यमाने विचार अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण केले आहे. या विषयावर या काळात रमेश वरखेडे यांचे ‘सायबर-संस्कृती ः इंटरनेट क्रांतीनंतरच्या सांस्कृतिक बदलांचा मागोवा’ यासारखे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. नवी पिढी या माध्यमातून व्यक्त होते आहे. त्याच्या गडद छटा समाजमाध्यमावर पहायला मिळतात. ग्रंथ परीक्षणे, परिचय, स्वागत, आवडलेली पुस्तके असे त्याचे स्वरूप आहे. यादृष्टीने राहूल बनसोडे (निवडक लेखसंग्रह) तसेच पंकज भोसले यांनी लोकप्रिय साहित्याविषयी लिहिलेली लेखमाला महत्त्वाची आहे. तसेच वाङ्मयविषयक चर्चा होणारे अनेक समूह गट समाज माध्यमात कार्यरत आहेत. श्रीधर तिळवे, अवधूत डोंगरे, दीपक बोरगावे, नीतीन वैद्य, सरिता सोमाणी व इतरही अनेक साहित्यिक समाजमाध्यमातून लेखन करीत आहेत. समाजमाध्यमांवरील लेखनास मुक्त अभिव्यक्तीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात बरचदा शेरेबाजी, प्रदर्शनबाजी, जाहिराती वा एकांगी मतांचा गलबला आहे. त्यात ट्रोलिंग आहे. काही वेळा त्यात निव्वळ हमरीतुमरीची चर्चा आहे. आता मराठी समीक्षेच्या असमाधानाबद्दलची काही निरीक्षणे. ती अनेक आहेत, त्यांपैकी काही. मराठीत विपुल प्रमाणात आशयलक्ष्ाी, वर्णनपर व आस्वादात्मक समीक्षा लिहिली जाते. रा. भा. पाटणकर यांनी मराठी समीक्षेच्या एका त्रुटींचा उल्लेख केला आहे. तो असा, मराठीतील समीक्षक तार्किकदृष्ट्या अप्रस्तुत गोष्टींवर भर देतात. दुसरी त्रुटी म्हणजे समीक्षकांने स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांचा आविष्कार करणे. (‘साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र’, पृ. 204). याबरोबरच मराठीत थिऑरिटिकल मॉडेल तयार करण्याची सवय नाही. (चंद्रशेखर जहागीरदार, ‘विसाव्या शतकातील मराठी समीक्षा’) तसेच भाषासाहित्याचे प्राध्यापक समीक्षा लिहित नाहीत, अशी प्रातिनिधिक स्वरूपातील खंत म. सु. पाटील यांनी व्यक्त केली होती. (‘साहित्य समीक्षा ः सिद्धान्त आणि व्यवहार,’ 2022) शिवाय समीक्षेच्या निकृष्ठतेला काही प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रातील विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांना सेवा बढतीसाठी समीक्षालेख लिहिण्याची घातलेली अट हेही एक कारण आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे प्राध्यापकांची ऑनलाईन निर्माण झालेली नियतकालिके व त्यातील समीक्षा. जी आधारहीन व कुचकामी ठरली. या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायला हवी. या काळातील समीक्षा आणि वाचक यांच्यातील सांगड तुटली. ‘जनता हे काव्याचे शेवटचे न्यायासन आहे आणि काव्य परीक्षक हे मधले न्यायासन’ असे श्री. व्यं. केतकर यांनी म्हटले होते. हा संबंध या काळात निखळला. मराठी समीक्षेला समकालीन साहित्याचा अन्वयार्थ लावता आलेला नाही. रा. श्री. जोग यांना जसे नवकवितेने चकवले तसेच मर्ढेकरांची कविता व ‘कोसला’ प्रसिद्ध झाल्यानंतर भल्या भल्या समीक्षकांना चकवले. याचा धागा भालंचद्र नेमाडे यांच्या एका भाषणात आहे तो असा, रा. भा. पाटणकरांच्या ‘सौंदर्यमीमांसा’ ग्रंथात वि. का. राजवाडे यांचा साधा उल्लेखही नव्हता आणि तो पुढे ‘अपूर्ण क्रांती’ या ग्रंथात पाटणकरांना राजवाडे यांचा लेख द्यावा लागला ही मराठी समीक्षेची कमाई हे निरीक्षण महत्त्वाचे आहे. याबरोबर मराठी समीक्षेत सापेक्षतादृष्टीचा प्रभाव आहे. वर्ग, जात, प्रदेश गट अशा हितसंबंधांच्या जाणिवा कार्यरत आहेत. तशाच या काळात वाङ्मयीन संस्था समीक्षा व्यवहाराबाबतीत दुबळ्या झाल्या. याबरोबरच लोकप्रिय वाङ्मयाचे काय करायचे हा प्रश्नही समीक्षेला सोडवता आलेला नाही. नवी पिढी शेरेबाजी व तुच्छतावादात अडकून पडली आहे. ‘समीक्षा केवळ एकाच पायावर उभी नसते तर तिला गोमेसारखे अनेक पाय असतात.’ (भालचंद्र नेमाडे, ‘विसाव्या शतकातील मराठी समीक्षा’) याचा मराठी समीक्षेला विसर पडला आहे. या समीक्षा विशेषांकाची पृष्ठ मर्यादा लक्षात घेता या काळातील समीक्षेतील सर्व विषयांचा अंतर्भाव करता आलेला नाही. उदा., भाषावैज्ञानिक, शैलीवैज्ञानिक व काही प्रमाणात अधिवासशास्त्रीय या उपयोजित समीक्षालेखनाची दखल घेता आलेली नाही. तसेच अनेक समीक्षकांचे/ग्रंथकारांचे उल्लेख राहून गेले आहेत. या अंकासाठी मान्यवर समीक्षकांनी लेख वेळेत लिहून दिले त्याबद्दल त्यांचे आभार. याकाळातील मराठी समीक्षेचे चित्र व भविष्यदिशांचे चित्र लक्षात येण्यासाठी हे लेखन महत्त्वाचे ठरू शकेल. रणधीर शिंदे अतिथी संपादक