खंड ७९ -- (ऑक्टोबर २०२५ - सप्टेंबर २०२६)

हा अंक युद्धाच्या छायेत निघतो आहे. या महिन्यात इराणशी अमेरिका आणि इस्रायलने युद्ध पुकारले आहे. अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा युद्ध जास्त दिवस चालले आहे. हे युद्ध असेच सुरू राहिले, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण येईल. केवळ एलपीजी उपलब्ध न होणे इतक्या पुरताच या युद्धाचा परिणाम मर्यादित नाही. याचे आर्थिक परिणाम अधिक व्यापक आहेत. एकतर युद्धामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत बरीच वाढ झाली आहे. युद्धाच्या सुरुवातीला ब्रेंट क्रूडची किंमत 66-70 डॉलर होती, ती 110 डॉलरवर पोहोचली आहे. भारत क्रूड आयात करतो. अर्थातच आयातीचा खर्च वाढला आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण बऱ्याच आधीपासून सुरू होती, पण जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती घसरत होत्या. त्यामुळे रुपया घसरला तरी त्याला घसरत्या तेल किमतीचा आधार होता. म्हणून आयात तेलाची किंमत फार वाढली नव्हती. पण आता तशी परिस्थिती नाही. आयात तेलाची किंमत वाढेल, कारण आता रुपया तर घसरतो आहेच, याचा एकत्रित परिणाम म्हणून देशांतर्गत महागाई वाढू शकते. याची झळ सर्वसामान्यांना बसेलच. शिवाय महागाई वाढू लागली, की रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवू शकते. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.