खंड ७९ -- (ऑक्टोबर २०२५ - सप्टेंबर २०२६)
.jpg)
भारत सरकारने 2004 साली निर्देशित केलेल्या तरतुदींच्या मार्गदर्शक सूत्रांनुसार अभ्यासाच्या अनेक टप्प्यांमधून गेल्यानंतर अखेरीस 2024 साली मराठी भाषेला ‘अभिजात-भाषा’ ही श्रेणी प्रदान केली. आता, मराठी ही तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांप्रमाणे ‘अभिजात’ या वर्गवारीत समाविष्ट झालेली आहे. सगळ्या मराठी भाषकांसाठी ही अर्थातच अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्या निर्णयाच्या वर्षपूतप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार व सहकार्याने ‘नवभारत’चा ‘अभिजात मराठी वर्षपूत विशेषांक’ वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. शंभराहून जास्त वर्षांची, चैतन्यदायी परंपरा लाभलेल्या प्राज्ञपाठशाळामंडळाचे आविष्कारपत्र असलेल्या ‘नवभारत’ मासिकाला ज्ञानसाधना, ज्ञानरचना यांची आणि ज्ञानात्मक आशयाला, प्रबोधनाच्या पातळीपर्यंत नेण्याची आस सातत्याने असते. या विशेषांकात ती प्रबोधनपरंपरा समकालीन संदर्भात उमटावी, तसेच पूर्वसूरींच्या चिंतनाचे संदर्भही जागवले जावेत, यांसाठी समकालीन, तसेच नव्या दमाच्या लेखक-विचारकांसमवेत नवभारतात याआधी प्रसिद्ध झालेले चिंतनात्मक लेखही समाविष्ट केले आहेत.