top of page

​​

प्राज्ञपाठशाळामंडळ वाई द्वारे प्रकाशित 

खंड ७८ -- (ऑक्टोबर २०२४ - सप्टेंबर २०२५)

नवभारत मासिक आता त्रैमासिक झाले आहे. नवभारतला 75 वर्षांची दीर्घ परंपरा आहे. गांधीवादी असणाऱ्या शंकरराव देवांनी 1947 मध्ये आवश्यक वाटले म्हणून हे मासिक म्हणून सुरू केले. ते उदारमतवादी विचारांचेच होते. उदारमतवादी विचार सार्वत्रिक स्वरुपाचे असतात, त्यांना स्थलकालाचे बंधन नसते व माणूस घडवणे हाच एक महत्त्वाचा विचार केंद्रस्थानी ठेवून ते मासिक चालवले जावे असे साहजिकपणे त्यांच्या मनात असणे स्वाभाविकच होते. पुढे ते मासिक रॉयवादी - समाजवादी विचारसरणी असणाऱ्या शास्त्रीबुवांकडे म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींकडे चालवायला आले. एका समर्थ परंपरेकडे ते चालवायला आले व सुदैवाने आजवर त्याला समर्थ संपादकही मिळाले. स्वत: शास्त्रीबुवा, मे. पुं. रेगे, वसंतराव पळशीकर, देवदत्त दाभोलकर, यशवंत सुमंत, श्री. मा. भावे, राजा दीक्षित यांनी सातत्याने ही ज्ञानपरंपरा चालवली. एका नि:स्वार्थ वृत्तीने निरपेक्षपणे हे काम आजवर केले गेले. स्वातंत्र्यकाळातल्या आचार्यांची परंपरा पुढे चालवली गेली. या 75 वर्षांत काळाने अनेक बदल पाहणे स्वाभाविकच होते. समाजाची जीवनशैली या 75 वर्षांच्या प्रदीर्घ काळात बदलणे, विज्ञान व तंत्रज्ञानात एवढ्या मोठ्या काळात बदल होणे हे झालेच. आता एकविसाव्या शतकाचे तिसरे दशक आहे. आता मोठे बदल सर्वच क्षेत्रात झाले आहेत. आपण काय करावे हा सनातन प्रश्न मात्र कायमच राहिला आहे. ‌‘मी कोण आहे?‌’ व ‌‘माझे गंतव्य स्थान काय आहे?‌’ हा सनातन प्रश्नही समकालीन विचारी माणसाच्या मनात डोकावणे अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे माणसाच्या स्व-शोधाचे व पर्यावरणाच्या शोधाचे कार्यही आदिकालापासून आजवर अविरतपणे चालू आहे.

bottom of page