खंड ७८ -- (ऑक्टोबर २०२४ - सप्टेंबर २०२५)
.jpeg)
"प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई यांच्या नवभारत या वैचारिक व अभ्यासपूर्ण प्रकाशनाची सुरुवात १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताच करण्यात आली. मानवाच्या व मानवसंस्कृतीच्या विकासास व उन्नतीस पोषक होईल. कै. शंकरराव देव यांची भूमिका होती अशी त्यामागे महाराष्ट्रीय जीवनाचा व संस्कृतीचा विकास करणे, हे या मासिकाचे ध्येय व उद्दिष्ट आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहत व मानवी जीवनाचे एक सृजनशील क्षेत्र 'दृश्यकला' या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन २०२४चा नवभारतचा दिवाळी अंक संपादित करण्याचे ठरविले. ही संधी मला दिल्याबद्दल श्री. भालचंद्र मोने व सर्वच संबंधितांचे मी प्रथम आभार मानतो.
वस्तुतः प्रकाशनविश्वात दृश्यकलेचे काम सजावटीचेच असते. परंतु या विषयाला वाहिलेला दिवाळी अंक काढायचा असे ठरताच माझ्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्हच होते. कारण असा दिवाळी अंक व तो नवभारतच्या परंपरेला साजेसा करणे हेच एक मोठे आव्हान होते. परंतु इच्छा तेथे मार्ग या न्यायाने या अंकाचे स्वरूप आपोआप ठरत गेले व त्याला कारण ठरला तो नवभारतच्या १९८८च्या दिवाळी अंकातील एक लेख ! हा लेख प्रा. बाबुराव सडवेलकर यांनी लिहिला होता व त्याचे शीर्षक होते, 'महाराष्ट्रातील दृककलांचा हरवत चाललेला इतिहास !' खरोखरच हा लेख प्रा. सडवेलकरांनी लिहिला, त्यावेळी जेवढा समयोचित होता, तेवढाच आज २०२४ मध्येही आहे असेच मला प्रकर्षाने वाटते.
कारण नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या दृश्यकला विषयाचा मी प्रमुख होतो. त्यानिमित्ताने सुमारे सव्वा वर्ष महाराष्ट्रभर प्रवास करून व बैठका घेऊन आम्ही जे काही अनुभवले ते खरोखरीच आपला महाराष्ट्र दृश्यकलेबाबत किती मागासलेला आहे. याचाच अनुभव देणारे होते. वस्तुतः महाराष्ट्राला दृश्यकलेची पूर्वापार परंपरा आहे. परंतु त्यांचे जतन-संवर्धन करणे, कलावंतांना प्रोत्साहन देणे, समाजात कलाविषयक उपक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करून समाजात कलासंपन्न करणे. अशा बाबतीत मात्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला तब्बल ६४ वर्षे होऊनही आपण मागासलेलेच आहोत हे आहे. याची प्रमुख कारणे शोधू जाता आपल्या असे लक्षात येईल की, यासंदर्भात व्यक्तिगत, सामाजिक व शासकीय पातळीवर दृश्यकलेसंदर्भात आस्था नाही तर फक्त उदासीनताच आहे. प्रगतशील महाराष्ट्राचे दृश्यकलेबाबतचे हे वास्तव खरोखरीच दुर्दैवी आहे. पण त्याबद्दल ना कोणाला खेद आहे, ना खंत!
म्हणूनच प्रा. बाबुराव सडवेलकरांना १९८८च्या नवभारतमध्ये 'महाराष्ट्रातील दृश्यकलेचा हरवत चाललेला इतिहास' हा लेख लिहावासा वाटला व आम्हाला नवभारत २०२४चा दिवाळी अंक हाच विषय केंद्रस्थानी ठेवून प्रकाशित करावा असे प्रकर्षाने वाटले."